तर मुद्दा हा की हे प्रॅक्टिकल मित्र जे सांगतात ते बरोबर आहे, प्रॅक्टिकली काही गोष्टी आता ह्या क्षणी शक्य पण नसतील, पण म्हणून चुकीच्या गोष्टी आहे तशाच करत राहायच्या? हा कुठला प्रॅक्टिकल ऍप्रोच? एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मकता आली कि ती गोष्ट स्वीकारण्याचे सगळे दरवाजे आपण बंद करतो. ह्या गतिमान युगात सगळ्यांना तात्काळ निकाल हवे आहेत. बटन दाबलं की गोष्टी झाल्या पाहिजेत. एखादा बीजरूपी विचार रुजवायचा त्याचं रोपामध्ये रूपांतर करायचं, त्याचं एका वटवृक्षात रूपांतर होईपर्यंत त्याची योग्य ती निगा राखायची, त्याला योग्य ते खतपाणी घालायचं आणि मग त्याला आलेली फळं चाखायची एवढा वेळ वाट पाहायला कोणाकडे सवड नाही. ज्यू लोकांना आपली भूमी सोडून परागंदा व्हावं लागलं, पण जिथे जिथे ते गेले तिथे तिथे नवीन वर्ष साजरा करतांना ते एक शपथ घेत, 'पुढचं नवीन वर्ष जेरुसलेम मधे साजरा करायचं'. असं पिढ्या दर पिढ्या बोललं गेलं आणि शेवटी साधारण दोन हजार वर्षांनी त्यांना त्यांची मायभूमी परत मिळाली. सुरवातीला ज्या पिढ्यांनी अशी शपथ घेतली त्यांनी ती किती प्रॅक्टिकल होती ह्याचा विचार केला नाही. ते फक्त आशावाद जिवंत ठेवत गेले. आपली भूमी आपल्याला मिळू शकेल हि आशा त्यांनी मरू दिली नाही. हा विचार त्यांनी मरू दिला नाही. हा विचार प्रॅक्टिकल नाही म्हणून जर का त्यांनी तेव्हाच मनातून काढून टाकला असता तर इस्राएल नावाचा एक प्रचंड सामर्थ्यवान आणि समृद्ध देश आज जगाला दिसलाच नसता. कदाचित एक सुसंस्कृत समाज नामशेष झाला असता. प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात ही अतिशय छोट्या कृतीतून होत असते. २९००० फुटांचा एव्हरेस्ट चढायचा असेल तर पहिलं पाऊल २९ सेन्टिमीटरचंच टाकावं लागतं. राजपूत, मराठा सगळे चांगले चांगले सरदार मोगलांचे, वेगवेगळ्या शाह्यांचे, मांडलिक असतांना एका १६ वर्षाच्या मुलानी स्वराज्याचं स्वप्न बघणं किती प्रॅक्टिकल होतं? जपान सारखा देश, अणुस्फोटानंतर कुठल्या आधारावर उभा राहिला? प्रॅक्टिकली विचार केला तर असा देश उभा राहणं शक्यच नव्हतं, पण तो उभा राहिला व आज जगातील एक सशक्त देश म्हणून मान ताठ करून वावरतो आहे. विषय जेव्हा समाजहिताचा असतो तेव्हा तात्कालिक उपलब्धी, परिणामांकडे कडे न बघता दीर्घकालीन परिणामांकडे बघणं जास्तं प्रॅक्टिकल असतं. कदाचित दिलेली सगळी उदाहरणांची अपवादात्मक आदर्शवादी उदाहरणं म्हणून हेटाळणी केली जाईल,
पहिल्या परिच्छेदात दिलेल्या उदाहरणांपैकी सेंद्रिय शेतीचा विषय, ती नफा देत नाही म्हणून सगळ्या समाजानी विषच खात राहायचं आणि विविध रोगांना आमंत्रणं द्यायची हा कुठला प्रॅक्टिकल विचार? रासायनिक शेतीमुळे जमिनीचा कस कमी होऊन जमीन नापीक करत जायची आणि मग धान्य आयात करायचं हा प्रॅक्टिकल विचार, का सेंद्रिय शेतीतून उत्पादन वाढवण्यासाठी संशोधन करायचं त्याला प्रोत्साहन द्यायचा हा प्रॅक्टिकल विचार? देशी गायचं दूध पुरणारच नाही म्हणून तो विचार टाकून द्यायचा की देशी गायींची संख्या वाढवणाऱ्या सगळ्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायचं? मुळात रोग होऊ नयेत म्हणून काय करावं हे सांगणारा, रोगांच्या मुळावर उपचार करणारा आयुर्वेद पाळणं प्रॅक्टिकल की खर्चीक पण वरवरचे उपचार करणारी ऍलोपॅथी फॉलो करणं प्रॅक्टिकल? आयुर्वेदात सर्जरी नाहीत हे अज्ञान आहे, सुश्रुत संहितेमध्ये अनेक प्रकारच्या सर्जरी सांगितल्या आहेत. पण मुद्दा तो नाही, एखाद्या गोष्टीचे दीर्घकालीन होणारे दुष्परिणाम दिसत असतांना, चालू असलेल्या आशावादी प्रयत्नांना प्रोत्साहन न देता, त्यात सामील ना होता केवळ निराशावादी विचार मांडणंआणि जे प्रयत्न करत आहेत त्यांना हतोत्साहित करणं हे प्रॅक्टिकल कसं? हा खरा मुद्दा आहे.
असो, एक सांगायचं राहिलं. विषय निघाला होता ते माझे मित्र लाकडी घाण्याचे तेल आणलं म्हणून सांगत होते त्यावरून. अस्तु.