आजच्या धावपळीच्या काळात, आरोग्य हा विषय कमालीचा उपेक्षित होत आहे. रोगनिदान, महागडे औषधोपचार, हॉस्पिटल, मेडिक्लेम ह्या सगळ्या भोवती आरोग्य ही संकल्पना फिरते आहे, निरोगी राहण्यासाठी योग्य दिनचर्या, आहार, विहार, विचार, जीवनमुल्ये ह्या गोष्टींचा काही संबंध आहे हे ह्या काळाला मान्य नाही. श्यामची आई (बाबा) होऊ पाहणाऱ्या महिला वर्ग कमी, आपलं मूल विकतच्या अन्नावर वाढवणारी कुटुंब शहरात तरी वाढत आहेत. अपत्ये निरोगी वाढवावीत ह्याचं महत्त्व कमी होऊन ती आजारी पडल्यावर ताबडतोब उत्तम व महागडे औषधोपचार मिळावेत, लगेच हाय डोसेज ऍंटिबायोटीक, व्हिटॅमिन, न्युट्रीशिअन देण्यासाठी तत्पर असलेले पालक वाढत आहेत. कित्येक औषधी मूल्य असलेल्या भाज्या, लोणची, डाळी, पदार्थ नामशेष होत आहेत, व आजचे पालक मुलांना मॅगी, पास्ता, भेळ, पाणीपुरी, पिझ्झा, नूडल्स, मोमोज, चिप्स, कुरकुरे, ह्यांच्या साहाय्याने वाढवण्यात व्यस्त आहेत. आठवड्यातून सरासरी २-३ वेळा बाहेरचे, परत परत उकळलेल्या तेलातील पदार्थ स्वतः खाण्यात आणि मुलांना खाऊ घालत असतांना सात्विक आहार संकल्पना नष्ट झाली आहे. पदार्थ बनवत असलेला आचारी कुठलेतरी अश्लील व्हिडिओ बघत किती तरी अस्वच्छता राखत ते पदार्थ बनवत असतील ह्याचा काहीच विचार न करता ते तामसी अन्न आपल्या मुलांना देत आहेत. मुलं तामसी होत आहेत. राग, द्वेष, लोभ, मोह, मत्सर, अहंकार इत्यादी तामसी गुणांची वाढ अशा प्रकारच्या तामसी वातावरणात बनवलेले अन्न खाल्ल्याने होते. आई वडील दोघेही घरी नाहीत, ते स्वतः देवासमोर बसून सात्विक वृत्ती वाढण्यासाठी काही साधना करत नाहीत त्यामुळे मुलांना पण ते करण्यासाठी आग्रह करू शकत नाहीत. त्यामुळे स्वाभाविकच तामोगुणांचा प्रभाव मुलांवर राहतो.
अशी तामसी पिढी मग सर्व प्रकारच्या सांस्कृतिक आक्रमणांना पूरक आचरण करते. भोगवाद, आत्मकेंद्री स्वभाव, ह्यातून वाढत जाणारा लोभ, मोह, मत्सर अहंकार कौटुंबिक कलहांना कारणीभूत ठरतो व कुटुंब एका दुष्टचक्रात सापडते. जे सात्विक पिढी निर्माण करू शकत नाही. भारतीय संस्कृतीत मानवी जीवनाचा मुख्य उद्देश संतती निर्माण हा सांगितला आहे. सम्यक संस्कारित प्रजोत्पादन म्हणजे संतती निर्माण. प्रजनन तर ईतर प्राणी पण करतात, पण संतती, जी ह्या विश्वाचा विचार करत आपलं आचरण करते ती निर्माण करणे. भारतीय जीवनमुल्ये, धर्म, संस्कृती, परंपरा जपणारी त्यांचे संवर्धन करणारी पिढी निर्माण करणे यासाठी आई वडील दोघांनीही संतती निर्माण हे आपले परम कर्तव्य समजून घेऊन त्याप्रमाणे आपला जीवन व्यवहार करण्याची आवश्यकता असतांना दोघांनीही 'चूल आणि मूल' चा उपहास न करता, विषय समजून त्यावरच फक्त फोकस करण्याची आवश्यकता आहे. हाच स्वबोध.....