मी प्रचारक असतांना चा प्रसंग. माझं प्रचारक म्हणून दुसरं वर्ष होतं, आता बऱ्यापैकी ओळखी वाढल्या होत्या, संबंध प्रस्थापीत झाले होते, माणसं आपल्याला कळायला लागलीत असं वाटू लागलं होतं, थोडक्यात डोक्यात हवा जायला लागली होती. अखंड भारत संकल्प दिन जवळ आला होता, मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थी संपर्क करून ह्या कार्यक्रमाला उपस्थित करावी असा विचार मनात आला व त्या दिशेनी कामाला लागलो. एक, दोन मोठया बैठक घेतल्या, कॉलेज, हॉस्टेल संपर्क रचना लावली, बैठका पण उत्साह वर्धक आणि मोठ्या संख्येच्या होत होत्या. एका दिवशी विभाग प्रचारकांचा, रामानंदजींचा प्रवास होता त्याच दिवशी बैठक होती. बैठक संपली आणि रामानंदजी कार्यायालयात आले. मी सगळ्यांना निरोप देण्यासाठी खालीच आलो होतो. रामानंदजींनी माझी विचारपूस केली, मी पण उत्साहात त्यांना सगळं इतिवृत्त कथन केलं. काय काय योजना केली आहे, कोण कोण मन लावून काम करतंय, आता पर्यंत किती संपर्क झाला, आणि एकूणच मोठी संख्या येणार असं आता तरी ह्या सगळ्या वातावरणावरून वाटतंय असं सांगितलं आणि ह्या सगळ्या खटाटोपीवरच्या अभिप्रायासाठी त्यांच्याकडे बघू लागलो. ते छानसं स्मित करत एकच वाक्य म्हणाले, "तुला कामाचा आनंद मिळतोय ना?" मी मोठे डोळे करून होकारार्थी मान हलवली, 'मग झालं तर' अशा संकेताची मान त्यांनी हलवली आणि आमच्या पुढच्या संवादाला सुरुवात झाली. पुढे काय बोलणं झालं ते फार आठवत नाही, पण हा संवाद माझ्या मनात घर करून गेला. नंतर कार्यक्रम झाला, फार काही उत्साहवर्धक संख्या येऊ शकली नाही. कार्यक्रम फसला. पण मला अनेक धडे शिकवून गेला. कदाचित रामानंदजींना हा निकाल महत्वाचा नव्हताच, पण त्यातून मला मिळणारा आनंद आणि मला मिळणारे अनुभव घेऊ द्यायचे होते. अनुभवातून येणारं शहाणपण हे सांगून येत नाही म्हणून असेल कदाचित, पण त्यांची ती प्रतिक्रिया, ते वाक्य मला बरंच काही शिकवून गेलं...६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा