सोमवार, २७ मे, २०१९

घडावा संघाचा संस्कार...४

मी अभियांत्रिकी च्या शिक्षणाला तुळजापूर ला असतानाची गोष्ट. २००१ ला अयोध्येत कारसेवा करायची आहे असे ठरले होते. बॅच, बॅच नी कारसेवक जाणार होते. लहान असल्यामुळे आधी कधीच मला जायची संधी मिळाली नव्हती, आणि ही संधी मला हातची जाऊ द्यायची नव्हती. मी कुठून आणि कसे आपला नंबर लावता येईल ह्यासाठी प्रयत्न करत होतो. पण मला समजावलं जात होतं की तू अजून लहान आहेस, शिक्षण पूर्ण कर तिकडे लक्ष दे. मला पण ते पटतही होतं, पण असंही वाटत होतं की कदाचित ही शेवटची संधी असेल, नंतर मिळेल का अशी संधी आपला सहभाग नोंदवायची? मी जाण्याचा हट्टच धरून बसलो. आमच्या जिल्हा प्रचारकांशी बोललो, त्यांना सांगितलं मला कसंही करुन जायचं आहे. त्यांना माझी इंटेंसीटी जाणवली असावी, म्हणाले मी बघतो काय ते. तु यमगरवाडी ला व्यवस्थेला येणार आहेस, तिथे भेटून ठरवू. महाशिवरात्रीच्या आधीच्या एक का दोन दिवस आम्ही सगळे मित्र तिथे व्यवस्थेत दाखल झालो. मला भेटताच प्रचारकांनी सांगितलं, की शेवटची बॅच एक दोन आठवड्यात जाणार आहे त्यांच्या सोबत तू जा. मी पण खूश झालो. माझा हट्ट पुरवला गेला होता. पूढचे २-३ दिवस व्यवस्थेत काम करण्यात गेले. कार्यक्रम संपवून आम्हाला निरोप देताना जिल्हा प्रचारकांना परत आठवण करून दिली मी जाणार आहे बरका शेवटच्या बॅचसोबत. ते पण म्हणाले, " जा बिनधास्त जा, माझं बोलणं झालं आहे". तुळजापूरला आलो, जायच्या दोन दिवस आधी काय काय तयारी करायची ते विचारण्यासाठी म्हणून संबंधीत कार्यकर्त्यांकडे गेलो. गप्पा झाल्या पण एक लक्षात आलं की शेवटची बॅच बहुतेक रद्द करण्यात येईल, अजून पाठवू नका असा निरोप आला आहे. थोडा नाराज होऊन रूमवर परत आलो. पूढे मित्र, कॉलेजच्या नादात विषय मागे पडला व रूटीन सुरु झाले. काही दिवसांनी प्रचारकांची भेट झाली, त्यांना कल्पना होतीच, मी परत माझी नाराजी सांगितली. म्हणालो मला जायचं होतं. तसं ते थोडे गालातल्या गालात हसले. मला लक्षात आलं, शेवटची बॅच रद्द होणार हे ह्यांना आधीपासूनच माहीती होतं, किंवा म्हणूनच मला त्या बॅच मधे जायला सांगितलं होतं. मला सगळा डाव कळला. पण लगेच ते पण म्हणाले, "मला पण जायचं होतं पण सूचना आहेत, प्रचारकांनी आपलं कार्यक्षेत्र सोडायचं नाही. काय करणार? अरे आत्ता तूझं शिक्षण पूर्ण कर, नंतर आहेच हे सगळं". मला पण काय कळायचं ते कळलं. आज इतक्या वर्षांनी ह्या घटनेकडे बघीतलं की जाणवतं, एखाद्याला थेट नाही म्हणणं सोपं असतं, पण त्याने तो दुखावला जाईल याची शक्यता जास्त असते. अशा वेळी योग्य पर्याय शोधावा, समोरचा हट्टीपणा करतोय म्हणून आपण तेवढाच हट्टीपणा करायची गरज नाही. कधी कधी 'ठंडा करके खाओ' पद्धत अवलंबली की हवा तो परिणाम साधता येतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा