लिहायला घेतलं तेव्हा लक्षात येतंय की आपल्या लिहिण्याची एक पद्धत आहे, लिहिण्यामागे काही विचार, काही चिंतन आहे. कदाचित त्या विचारांना, चिंतनाला मोकळी वाट करून देण्यासाठीच मी लिहितो आहे. जसं कळायला लागलं तसं, म्हणजे साधारण ९०-९२ पासून च्या घटना, माणसं आठवतात. घटनांचे अर्थ लागतात. तेव्हा पासूनच्या एकूणच माणसांच्या सहवासातून, वागण्याबोलण्यातून, स्वतःचं त्यांच्याशी वागण्याबोलण्यातून, कधी मिळालेल्या, कधी मिळवलेल्या एकांतातून काही अनुभव मिळाले, त्याच्या प्रभावातून काही विचारतरंग मनावर येत गेले, चिंतन करत गेलो, त्यातून काही निष्कर्ष, कदाचीत प्राथमिक निष्कर्ष, पण ते निघत गेले, आणि वाटलं हे कुठे सांगितले नाहीत, तर तुंबल्यासारखं होईल.
पण लक्षात असं आलं, की हे सगळं सांगायला योग्य श्रोता कधीच मिळत नसतो, आपल्या जाणिवेच्या तीव्रते एवढी तीव्रता असणारा श्रोता मिळणं म्हणजे मोक्षच, मिळालाच तर तो श्रोता, श्रोता राहात नाही, तो आणि आपण एकच होऊन जातो, म्हणून श्रोता आपणच व्हावं लागतं हे लक्षात आलं. कदाचित लेखक असेच घडत असावेत. स्वतःच्या स्वतःशीच होण्याऱ्या संवादातून. अश्याच काही लेखकांचा माझ्या लेखनावर, विचारांवर, चिंतनावर, स्वभावावर आणि एकूणच माझ्या व्यक्तिमत्वावर मला प्रभाव जाणवला. त्यात प्रामुख्यानी वपु, गोनीदा, सुहास शिरववळकर ह्यांचा उतरत्या क्रमाने प्रभाव मला जाणवतो. जरा वेगळा प्रभाव दत्तोपंत ठेंगडी ह्यांचाही आहे, विशेषतः वेगळा विचार कारण्याची, आणि तो मांडण्याची त्यांची पद्धत, ह्या दोन्हीचा प्रभाव माझ्या वागण्यात नसला तरी तो विचार करण्याच्या पद्धतीत नक्की आहे.
साधारण ९७ पासून शिक्षणा निमित्त घराबाहेर होतो, २००८-०९ पर्यंत हे भटकणं चालू राहिलं. ह्या ११-१२ वर्षांनी मला घडवलं, कोषातून बाहेर काढलं, चांगलं वाईट सगळंच दाखवलं, माझं व्यक्तिमत्व ढवळून निघालं. तसंही काळच माणसाला घडवतो. नंतरच्या १२-१३ वर्षांमधे, म्हणजे आताआतापर्यंत, मिळालेल्या दायीत्वामुळे अनेकांशी भेटण्याचा योग आला, आयुष्य अधिकच समृद्ध होत गेलं, संघ समज होती त्यापेक्षा वाढली, व्यक्तिमत्व आधी होतं त्यापेक्षा प्रगल्भ होत गेलं, कशामुळे? तर भेटलेल्या माणसांमुळे, मिळालेल्या अनुभवांमुळे, त्या त्या काळात घडलेल्या छोट्या छोट्या घटनांमुळे. काही मोठी व्यक्तिमत्व, मोठ्या घटनाही दीर्घ परिणाम करून गेल्या. ह्या सगळ्याचा प्रभाव माझ्या विचारांवर, चिंतनावर पडला आणि तो ह्या लेखनातून झिरपत आहे. २८-३० वर्ष म्हणजे दोन ते अडीच तपं होतात. हे लेखन काही मोजक्या व्यक्तींच्या, किंवा काही मोजक्या घटनांवर आधारित नाही, तर ह्या दोन अडीच तपांमध्ये, अनेक भेटलेल्या, न भेटलेल्या, जवळून बघितलेल्या, दुरून बघितलेल्या व्यक्तींवर, घटनांवर बेतलेलं आहे, त्यांच्या निरीक्षणावर बेतलेलं आहे. कदाचित त्याला काही ठिकाणी थोडी, किंवा काही ठिकाणी जरा जास्तच, कल्पनेची जोड असेल, पण कल्पना विलास टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या अल्पमतीप्रमाणे केला आहे. कधी कधी आपली गृहीतकं आणि निष्कर्ष कालांतरानी कल्पना विलास ठरतात, त्याला पर्याय नाही. मनाच्या त्या त्या वेळेच्या अवस्थेला जे जे सत्य वाटलं ते कालांतरानी मिथ्या असतं, हा जगाचा नियम इथेही लागू होतोच, तेव्हा...