काही वर्षांपूर्वीची घटना, बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला होता. चांगला एक दीड तास त्याचं जवळून निरीक्षण करता आलं. त्यांचं प्रत्येकाशी अदबिनी, आपुलकीनी वागणं जवळून अनुभवता आलं. बोलतांना कायम हसतमुख असलेला चेहरा आणि चेहऱ्यावर असलेलं तेज ह्याकडे बघत राहावं वाटत होतं. बाबासाहेब तिथे सामुहिक शिवचरित्र वाचन कार्यक्रमाच्या समारोपासाठी म्हणून आले होते. त्यांच्या आवडीच्या विषयावर बोलायला त्यांनी सुरुवात केली. बाबासाहेब बोलत असतांना कोणीतरी फोटो काढण्यासाठी म्हणून उठले आणि बाबासाहेब बोलायचे थांबले. ते एकटक त्या व्यक्तीकडे बघू लागले, तिथे बसलेल्यांना इतरांना काय कळायचे ते कळले व लगेच त्या व्यक्तीला खाली बसवण्यात आले. ती व्यक्ती बसल्यावर बाबासाहेब त्याच्याकडे बघून छानसं निर्मळ हसले आणि पुढे बोलायला सुरुवात केली. पाच ते दहा सेकंदात हे घडलं असेल. हा प्रसंग माझ्या मनात कोरला गेला. बाबासाहेब साधारण अर्धा ते पाऊण तास बोलले. नेहमीप्रमाणे छानच बोलले. टिपण काढण्याची सवय नसल्यामुळे जे ऐकलं ते पुढच्या २-४ दिवसात विसरायला झालं पण हा प्रसंग काही केल्या मनातून जात नव्हता. राहून राहून एक विचार मनात येत होता तो म्हणजे हे असं न बोलता, फक्त नजरेने बोलणारे, आपल्याला काय सांगायचं आहे ते अतिशय कमी वेळात, समोरच्याला न दुखावता, त्याला आपलंसं करत, पण त्याची चूक त्याला सांगणारे, आणि अशी चूक सांगण्याचा हक्क, अधिकार असणारे लोक आपल्या सुदैवाने आपल्याला बघायला, ऐकायला मिळाले पण पुढच्या पिढीचं काय? पुढच्या पिढीला असे कर्तृत्ववान लोकं बघायला, ऐकायला मिळतील का? त्यांना त्याचं काय चुकतंय कुठे चुकतंय हे सांगणारे, सांगायचा अधिकार आपल्या कर्तृत्वानी मिळवणारे लोकं आमच्या पिढीत तयार होतील का? आणि तसं होणार नसेल तर ते का? ह्याचा विचार करता करता काही मुद्दे लक्षात आले ते असे.
पूर्वी कोणी चुकलं तर हक्कानी कान धरून चुका सांगणाऱ्या अधिकारी व्यक्ती असायच्या. ह्या व्यक्ती वयानी, कर्तृत्वानी, अधिकरानि आणि चारीत्र्यानी पण मोठ्या असायच्या. ह्यांनी ह्यांचे बालपण कष्टात काढलेले असायचे, लहानपणापासून कष्ट करून आधी इतरांची मग स्वतःची प्रगती केलेली असायचि. ह्यांच्याकडे विद्वत्ता, व्यासंग इत्यादी गुणांचा कायमचा मुक्काम असयचा. ह्यांचे चारित्र्य धुतल्या तांदूळासारखे स्वच्छ असायचे. ह्यांनी कधीही आपल्या कामापेक्षा आणि कुवतीपेक्षा जास्त पैशाची अपेक्षा केलेली नसायची. जे काम हाती घेतलं ते इतकं मन लावून पूर्ण करायचे कि त्या कामातला त्यांचा शब्द शेवटचा मानला जायचा. ह्यांची प्रत्येक कृती हि सामाजिक बंधने सांभाळणारी व पाळणारी असायची. ह्यांचा ठायी कुठेही अहंकार नसायचा, आपण जे करतो ते परमेश्वर आपल्याकडून करून घेतो ह्यावर त्यांचा ठाम विश्वास असायचा. कर्तृत्वानी, ज्ञानानी आपल्या पेक्षा मोठ्या असणाऱ्या किंवा समान असण्याऱ्या व्यक्ती बद्दल ह्यांना योग्य आदर असायचा. ह्यांनी आयूष्यात कुठलेही व्यसन केलेले नसायचे, अपवादानी तंबाखू खाणारे असायचे पण तो अपवाद होता आणि महत्वाचं म्हणजे व्यसनी नसणाऱ्याला बावळट ठरवले जात नव्हते. ह्यांचा एक प्रकारचा आदरयुक्त धाक असायचा. काहीही चुकीचं करताना, वागताना ह्या व्यक्तीची प्रतिक्रिया काय असेल ह्याचा विचार करून वागावं लागायचं. आणि एवढं करूनही जाणते अजाणतेपणी काही चूक झाली तर हि व्यक्ती कानउघाडणी करणार, आणि ती चूक पुन्हा होणार नाही अशी व्यवस्था करणार ह्याची खात्री असायची. अशी गुणसंपन्न माणसं तेव्हा मुबलक प्रमाणात होती. अशांची आयुष्य म्हणजे एक यज्ञ असायची आणि त्याचे तेज ह्यांच्या मुखमंडलावर दिसायचे. शिक्षक पण साधारण ह्याच व्यक्तिमत्वाची असायची. तसेच प्रत्येक कुटुंबात किमान एक तरी व्यक्ती अशा व्यक्तिमत्वाची नक्की असायची.
अशी माणसे आताच्या काळात फारशी बघायला मिळत नाहीत, मी ज्या पिढीतला आहे त्या पिढीची आताची परस्थिती अशी आहे कि, आम्ही लोकं (सर्वसामान्यतः, काही नम्र अपवाद नक्कीच आहेत )फक्त वयानी मोठी होत आहोत. कर्तृत्व म्हणाल तर ते एवढंच असतं कि आम्ही स्वत:चा संसार उत्तम (?) केलेला असतो, घरातील २-४ माणसांसह ५ खोल्यांच्या घरात आम्ही रहातो, नौकरीत चांगल्या(?) हुद्द्यावर असतो आणि पुढील बढतीकडे डोळे लावून बसलेली असतो. इतर कोणासाठी फार काही करावं अशी वैचारिक बैठकाही नसते आणि सुदैवानी किंवा दुर्दैवाने तशी वेळही आमच्यावर येत नाही. त्यामुळे फारशी माणसंही जोडलेली नसतात. चारित्र्य फार चर्चा करावी इतकं वाईट नसतं पण कोणाला आदर वाटेल एवढं विशेष पण नसतं. प्रत्येकानी किमान वाहतूक पोलिसाला तरी घूस दिलेली असतेच, वर्षानुवर्ष कर चुकवण्यासाठी घरभाड्याच्या, औषधाच्या खोट्या पावत्या दाखवणे इत्यादी वाम मार्ग वापरलेले असतातच त्यामुळे वागण्या बोलण्यात चारित्र्यवान माणसाचे तेज नसते. ज्ञान हे परीक्षेपुरता / कामापुरता मिळवलेलं असतं आणि हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे खूप विषयांची माहिती असते पण ती वरवरची, समोरच्या माणसावर प्राथमिक प्रभाव टाकण्यापुरती. असा प्रभाव दीर्घकाळ टीकत नाही. त्यामुळे ज्ञानाचे, व्यासंगाचे तेजही नसते. धुम्रपान, दारू इत्यादी व्यसन नसलेल्या माणसाकडे आम्ही अतिशय आदराने (कधी कधी बावळट म्हणून ) बघतो कारण तो आता अपवाद राहिला आहे. महाविद्यालयातून नुकताच बाहेर पडलेला तरुण आता आपल्या कुवतीपेक्षा जास्त पैशाची अपेक्षा करू लागला आहे. आम्ही कमी कामाची, जास्त पगाराची, त्यातही परदेशात जाण्याची संधी असणारी नौकरी मिळवण्यात धन्यता मानायला लागलो आहोत. परदेशात जाण्यामागे ज्ञान मिळवण्याचा हेतू नसून तेवढ्याच कामात जास्त पैसा मिळतो आणि त्यात काही गैर आहे असं आम्हाला चकुनसुद्धा वाटत नाही. ज्ञान हा शब्द जाऊन त्याजागी पत (status) हा शब्द माणसाची वर्गवारी करू लागला आहे. त्यामुळे "आदर" ही आता ज्ञानामागे न धावता status सोबत हातात हात घालून चालू लागला आहे.
अधमा धनमिच्छन्ति धनं मानं च मध्यमा: |
उत्तमा मानमिच्छन्ति मानो हि महतां धनम् ||
सुभाषिताचा अर्थ असा कि अधम लोक कशाही रीतीने मिळाला तरी चालेल पण हवाच अशारीतीने पैशाची
इच्छा धरतात. मध्यम प्रकारचे लोक पैसा तर हवा पण तो मान मिळेल
अशा रीतीने मिळवतात. थोर लोकांना स्वाभिमान महत्वाचा असतो. धन न मिळालं
तरी चालेल, त्यांच तिकडे लक्षच नसत, मान हेच त्यांच्यासाठी धन असतं.
ह्या सुभाषीताप्रमाणे वागणारे काही नम्र अपवाद नक्कीच आहेत पण ते "अपवाद" आहेत.
ह्या सुभाषीताप्रमाणे वागणारे काही नम्र अपवाद नक्कीच आहेत पण ते "अपवाद" आहेत.