मंगळवार, २ एप्रिल, २०१९

माझी असामान्य सहचारीणी...नेहा

मला आठवतं, लग्न ठरतांना मी नेहाला म्हणालो होतो, "मी संघाचं काम करतो, आणि ते मी पुढेही करणार, मला अडवायचं नाही". ती पण म्हणाली होती, "मला एवढं माहीत नाही, पण माझी काही हरकत नाही". पण मला (आणि नेहाला पण) नंतर कळलं, की हा संवाद म्हणजे पहीलीतल्या मुलाकडून मी डॉक्टर होणार आहे हे वदवून घेण्यासारखं होतं. हे सगळं आठवायचं कारण, कालचा प्रसंग. मी बाबांशी सध्या चाललेल्या नगर नियोजन बैठका वगैरे विषयांबद्दल चर्चा करत होतो. सगळं सांगून झाल्यावर बाबा अचानक म्हणाले, "छान, तु किती भाग्यवान आहेस, तुला ह्या सगळ्याचा भाग होता येतं, आणि तुला नेहाची पण साथ आहे, असं भाग्य कमी जणांना मिळतं". मी पण म्हणालो, "खरंय". माझं जेवण राहीलं असल्यामुळे चर्चा ईथे थांबली. पण हा विषय मनात घोळत राहीला. खरंच आपण किती भाग्यवान!! एका स्वयंसेवकाच्या घरीच जन्माला येण्यापासून हा भाग्याचा प्रवास सुरू होतो. बाबांमुळे संघाचा परीसस्पर्श झाला, सतत स्थलांतरीत होत असतांनाही संघाशी जोडलेले राहीलो, अर्थात ह्याचं श्रेय त्या त्या कार्यकर्त्यांनाच, तरीपण, हे भाग्य सगळ्यांना मिळत नाही. असामान्य कार्यकर्त्यांच्या सहवासात आलो, ज्यांच्याकडे बघून संघकाम करत राहाण्याची प्रेरणा मिळते (किती करतो हा भाग वेगळा), असे कार्यकर्ते आजुबाजूला असायला पण भाग्यच लागतं. ह्या सगळ्यावर कडी म्हणजे संघकामाला घरातून पाठींबा असणं. माझ्या बायकोचा, नेहाचा माझ्या संघकामाला पाठींबा हा खरंच मला फार फार भाग्यवान ठरवतो. मी कितीतरी असे चांगले कार्यकर्ते बघीतले आहेत, जे कामात आले तर कामाला वाघ, पण लग्न झालं आणि त्यांचे पिंजर्यातले वाघ झाले. लग्न झाल्यावर नवर्याला ठणकावून संघकाम बंद करायला लावणार्या कित्येक वहीनी आणि काकू पण बघीतल्या आहेत. कीत्येक कार्यकर्त्यांची, घरातून पाठींबा  नसल्यामुळे संघकाम करता येत नाही म्हणून होणारी मानसीक कुचंबणा बघीतली आहे. थोडी अतिशयोक्ती ठरेल, पण काही जणं असे पण बघीतले आहेत की पत्नीचा स्वर्गवास झाला आणि मग पुन्हा संघकामाला वाहून घेतलं. आपल्या जोडीदाराला आपल्या भावना न कळणं ह्यासारखं दुसरं शल्य नाही. अशी सगळी उदाहरणं मनःपटलावर येऊन गेली आणि जाणवलं, मी खरंच खूप खूप भाग्यवान म्हणून मला नेहासारखी पत्नी लाभली.
  आमच्या लग्नाला १० वर्ष होत आलीत. जसं लग्न झालं तसं एकही वर्ष गेलं नाही की माझ्याकडे दायीत्व नाही. ह्या १० वर्षात असे फार क्वचीत प्रसंग आले की आमच्या मधे माझ्या संघकामामुळे काही विसंवाद झाला, ह्याचं कारण नेहाचा समजूतदार स्वभाव. आग्रही असणं आणि दुराग्रही असणं ह्यातला फरक ती चांगला ओळखते. मी घरी वेळ दिला पाहिजे म्हणून आग्रही असते पण दुराग्रही कधीच नसते. माझी संघकामाची ईच्छा ती चांगलीच जाणून आहे. ती मला पूर्ण करता यावी म्हणून मला लागेल ते सहकार्य ती मनापासून करते. आणि त्या इच्छेचा योग्य तो आदर ठेवून. अशी बरीच उदाहरणं आजुबाजूला दिसतात की नवर्याचं संघकाम हे त्याच्या घरच्यांच्या टवाळीचा विषय असतो. थट्टा म्हणून कधी कधी ठिक आहे, पण संघकामाबद्दल अनादर मात्र दोघांमधली दरी वाढवतो. असा संघकामाबद्दलचा अनादर नेहानी कधीच केला नाही.
संघकाम करतांना बरेच कार्यकर्ते असे भेटतात, ज्यांना घर सांभाळून, नौकरी व्यवसाय सांभाळून, शिवाय संघकामासाठी वेळ काढणं जमत नाही, बरेच विद्यार्थी अभ्यासामुळे संघकामाला वेळ द्यायला नाही म्हणतात. माझ्या मते त्यांना मानसीक involvement नको असते कारण multitasking चा ताण नको असतो. स्वाभाविक आहे. पण मी जेव्हा नेहाच्या schedule कडे बघतो तेव्हा जाणवतं की घरातली गृहीणी multitasking master, planning master असते. मुलींचे डबे, जेवणं, शाळा, क्लासेस, त्याची हौसमौज, घरची कामं, माहेर-सासरच्या नातेवाईकांशी संबंध ठेवणे, सणवार करणं, भिशी अरेंज करणं, घरात येणाऱ्या मावश्या सांभाळणं, शेजार्यांशी जुळवून घेणं, मित्र मैत्रिणी ना पण वेळ देणं, स्वतः काही करायची धडपड करणं, आणि ह्यावर कडी म्हणजे नवरा सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी ती एकाचवेळी करत असते. आणि ह्या सगळ्याचा ताण असुनही हसतमूख असते. हे स्कील तीला आणि तिच्या सारख्या अनेक गृहीणींना असामान्य ठरवतं.
  कित्येक सर्वसामान्य स्वयंसेवकांच्या सहभागाने संघासारखं असामान्य काम उभं राहीलं आहे. कारण त्या सर्वसामान्य स्वयंसेवकांना त्यांच्या असामान्य पत्नीची साथ मिळाली. त्याशिवाय हे शक्य नव्हतं आणि पुढे पण शक्य नाही.
जसा मी, मला लाभलेल्या आईवडीलांसाठी देवाचा ऋणी आहे तसाच, मला नेहा सारखी असामान्य पत्नी दिली म्हणूनही मी देवाचा ऋणी आहे. धन्योहम् ....!!