गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

२९००० फुटांचा एव्हरेस्ट चढायचा असेल तर पहिलं पाऊल २९ सेन्टिमीटरचंच टाकावं लागतं.....

काल ऑफिस मध्ये मित्रांशी गप्पा मारतांना विषय सुधांशु त्रिवेदींच्या एका विडिओ पाशी आला. त्या मध्ये सुधांशूजींनी असं सांगितलं होता की कसा आपला समाज परत ५० वर्षा पूर्वी ज्या गोष्टी जुन्या मागास म्हणून टाकून दिल्या होत्या त्याच गोष्टी आता कशा चांगल्या आहेत म्हणून त्यांच्या मागे चालला आहे, उदाहरणार्थ सेंद्रिय शेती, गायीचे दूध, आयुर्वेद वगैरे मुद्दे त्यांनी विडिओ मध्ये सांगितले होते. मी तेच मुद्दे एक एक करून सांगत असताना माझे प्रॅक्टिकल मित्र हे कसं इम्प्रॅक्टिकल आहे हे सांगत होते. हे सगळे लोकं इम्प्रॅक्टिकल आहेत, विशेषतः राजकीय लोकं हे असे मुद्दे मांडत असतात, वगैरे वगैरे. सेंद्रिय शेतीत रासायनिक शेती एवढं पीक आणि उत्पन्न येऊच शकत नाही, सेंद्रिय पिकांना कीड जास्तं लागते, त्यामुळे ती प्रॅक्टिकली शक्यच नाही, देशी गायीचं दूध एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरणारच नाही, बंद करा मग बाकी दूध उत्पादनं, द्या सगळ्यांना फक्त देशी गायीचं दूध, बघूया पुरतंय का, आयुर्वेदात आहे का ब्रेन सर्जरी सांग मला आयुर्वेद करू शकतं का मेंदूचं ऑपेरेशन? असा साधारण त्यांचा उपरोधिक सूर होता, आणि वैतागलेले वाटले ह्या सगळ्या विषयांवर. मी फार उत्तर देत बसलो नाही, म्हणलं बरोबर आहे तुमचं, हे सगळं प्रॅक्टिकल नाही. आता कालपरवा चीननी ३७० संदर्भात पाकिस्तानची बाजू घेतल्यावर लगेच चिनी वस्तूंवर बहिष्काराचे मेसेजेस फिरायला लागले, तर लगेच अशाच काही प्रॅक्टिकल मित्रांच्या प्रतिक्रिया पण सुरु झाल्या. किती गोष्टींवर बहिष्कार टाकणार, चिनी वस्तूंऐवढं स्वस्त कुठे मिळणार आहे. चिनी वस्तू नाही घ्यायच्या म्हणलं तरी भारतात ह्या सगळ्या वस्तू बनवणं प्रॅक्टिकली शक्य आहे का? वगैरे वगैरे .... मागच्या दिवाळीत घरच्यांनी चुकून चायनीज माळ घरी आणली तर मी ती परत करण्यासाठी दुकानात गेलो आणि भारतीय बनावटीची माळ मागितली. दुकानदार माझ्याशी वाद घालायला लागला की तुमचा मोबाईल कोणता आहे, किती गोष्टी तुम्ही परत करणार? तोच बुद्धिवाद...

तर मुद्दा हा की हे प्रॅक्टिकल मित्र जे सांगतात ते बरोबर आहे, प्रॅक्टिकली काही गोष्टी आता ह्या क्षणी शक्य पण नसतील, पण म्हणून चुकीच्या गोष्टी आहे तशाच करत राहायच्या? हा कुठला प्रॅक्टिकल ऍप्रोच? एखाद्या गोष्टीबद्दल नकारात्मकता आली कि ती गोष्ट स्वीकारण्याचे सगळे दरवाजे आपण बंद करतो. ह्या गतिमान युगात सगळ्यांना तात्काळ निकाल हवे आहेत. बटन दाबलं की गोष्टी झाल्या पाहिजेत. एखादा बीजरूपी विचार रुजवायचा त्याचं रोपामध्ये रूपांतर करायचं, त्याचं एका वटवृक्षात रूपांतर होईपर्यंत त्याची योग्य ती निगा राखायची, त्याला योग्य ते खतपाणी घालायचं आणि मग त्याला आलेली फळं चाखायची एवढा वेळ वाट पाहायला कोणाकडे सवड नाही. ज्यू लोकांना आपली भूमी सोडून परागंदा व्हावं लागलं, पण जिथे जिथे ते गेले तिथे तिथे नवीन वर्ष साजरा करतांना ते एक शपथ घेत, 'पुढचं नवीन वर्ष जेरुसलेम मधे साजरा करायचं'. असं पिढ्या दर पिढ्या बोललं गेलं आणि शेवटी साधारण दोन हजार वर्षांनी त्यांना त्यांची मायभूमी परत मिळाली. सुरवातीला ज्या पिढ्यांनी अशी शपथ घेतली त्यांनी ती किती प्रॅक्टिकल होती ह्याचा विचार केला नाही. ते फक्त आशावाद जिवंत ठेवत गेले. आपली भूमी आपल्याला मिळू शकेल हि आशा त्यांनी मरू दिली नाही. हा विचार त्यांनी मरू दिला नाही. हा विचार प्रॅक्टिकल नाही म्हणून जर का त्यांनी तेव्हाच मनातून काढून टाकला असता तर इस्राएल नावाचा एक प्रचंड सामर्थ्यवान आणि समृद्ध देश आज जगाला दिसलाच नसता. कदाचित एक सुसंस्कृत समाज नामशेष झाला असता. प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात ही अतिशय छोट्या कृतीतून होत असते. २९००० फुटांचा एव्हरेस्ट चढायचा असेल तर पहिलं पाऊल २९ सेन्टिमीटरचंच टाकावं लागतं. राजपूत, मराठा सगळे चांगले चांगले सरदार मोगलांचे, वेगवेगळ्या शाह्यांचे, मांडलिक असतांना एका १६ वर्षाच्या मुलानी स्वराज्याचं स्वप्न बघणं किती प्रॅक्टिकल होतं? जपान सारखा देश, अणुस्फोटानंतर कुठल्या आधारावर उभा राहिला? प्रॅक्टिकली विचार केला तर असा देश उभा राहणं शक्यच नव्हतं, पण तो उभा राहिला व आज जगातील एक सशक्त देश म्हणून मान ताठ करून वावरतो आहे. विषय जेव्हा समाजहिताचा असतो तेव्हा तात्कालिक उपलब्धी, परिणामांकडे कडे न बघता दीर्घकालीन परिणामांकडे बघणं जास्तं प्रॅक्टिकल असतं. कदाचित दिलेली सगळी उदाहरणांची अपवादात्मक आदर्शवादी उदाहरणं म्हणून हेटाळणी केली जाईल,

पहिल्या परिच्छेदात दिलेल्या उदाहरणांपैकी सेंद्रिय शेतीचा विषय, ती नफा देत नाही म्हणून सगळ्या समाजानी विषच खात राहायचं आणि विविध रोगांना आमंत्रणं द्यायची हा कुठला प्रॅक्टिकल विचार? रासायनिक शेतीमुळे जमिनीचा कस कमी होऊन जमीन नापीक करत जायची आणि मग धान्य आयात करायचं हा प्रॅक्टिकल विचार, का सेंद्रिय शेतीतून उत्पादन वाढवण्यासाठी संशोधन करायचं त्याला प्रोत्साहन द्यायचा हा प्रॅक्टिकल विचार?  देशी गायचं दूध पुरणारच नाही म्हणून तो विचार टाकून द्यायचा की देशी गायींची संख्या वाढवणाऱ्या सगळ्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यायचं? मुळात रोग होऊ नयेत म्हणून काय करावं हे सांगणारा, रोगांच्या मुळावर उपचार करणारा आयुर्वेद पाळणं प्रॅक्टिकल की खर्चीक पण वरवरचे उपचार करणारी ऍलोपॅथी फॉलो करणं प्रॅक्टिकल? आयुर्वेदात सर्जरी नाहीत हे अज्ञान आहे, सुश्रुत संहितेमध्ये अनेक प्रकारच्या सर्जरी सांगितल्या आहेत. पण मुद्दा तो नाही, एखाद्या गोष्टीचे दीर्घकालीन होणारे दुष्परिणाम दिसत असतांना, चालू असलेल्या आशावादी प्रयत्नांना प्रोत्साहन न देता, त्यात सामील ना होता केवळ निराशावादी विचार मांडणंआणि जे प्रयत्न करत आहेत त्यांना हतोत्साहित करणं हे प्रॅक्टिकल कसं? हा खरा मुद्दा आहे.

असो, एक सांगायचं राहिलं. विषय निघाला होता ते माझे मित्र लाकडी घाण्याचे तेल आणलं म्हणून सांगत होते त्यावरून. अस्तु.





सोमवार, २ डिसेंबर, २०१९

घडावा संघाचा संस्कार....६

 मी प्रचारक असतांना चा प्रसंग. माझं प्रचारक म्हणून दुसरं वर्ष होतं, आता बऱ्यापैकी ओळखी वाढल्या होत्या, संबंध प्रस्थापीत झाले होते, माणसं आपल्याला कळायला लागलीत असं वाटू लागलं होतं, थोडक्यात डोक्यात हवा जायला लागली होती. अखंड भारत संकल्प दिन जवळ आला होता, मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयीन विद्यार्थी संपर्क करून ह्या कार्यक्रमाला उपस्थित करावी असा विचार मनात आला व त्या दिशेनी कामाला लागलो. एक, दोन मोठया बैठक घेतल्या, कॉलेज, हॉस्टेल संपर्क रचना लावली, बैठका पण उत्साह वर्धक आणि मोठ्या संख्येच्या होत होत्या. एका दिवशी विभाग प्रचारकांचा, रामानंदजींचा प्रवास होता त्याच दिवशी बैठक होती. बैठक संपली आणि रामानंदजी कार्यायालयात आले. मी सगळ्यांना निरोप देण्यासाठी खालीच आलो होतो. रामानंदजींनी माझी विचारपूस केली, मी पण उत्साहात त्यांना सगळं इतिवृत्त कथन केलं. काय काय योजना केली आहे, कोण कोण मन लावून काम करतंय, आता पर्यंत किती संपर्क झाला, आणि एकूणच मोठी संख्या येणार असं आता तरी ह्या सगळ्या वातावरणावरून वाटतंय असं सांगितलं आणि ह्या सगळ्या खटाटोपीवरच्या अभिप्रायासाठी त्यांच्याकडे बघू लागलो. ते छानसं स्मित करत एकच वाक्य म्हणाले, "तुला कामाचा आनंद मिळतोय ना?" मी मोठे डोळे करून होकारार्थी मान हलवली, 'मग झालं तर' अशा संकेताची मान त्यांनी हलवली आणि आमच्या पुढच्या संवादाला सुरुवात झाली. पुढे काय बोलणं झालं ते फार आठवत नाही, पण हा संवाद माझ्या मनात घर करून गेला. नंतर कार्यक्रम झाला, फार काही उत्साहवर्धक संख्या येऊ शकली नाही. कार्यक्रम फसला. पण मला अनेक धडे शिकवून गेला. कदाचित रामानंदजींना हा निकाल महत्वाचा नव्हताच, पण त्यातून मला मिळणारा आनंद आणि मला मिळणारे अनुभव घेऊ द्यायचे होते. अनुभवातून येणारं शहाणपण हे सांगून येत नाही म्हणून असेल कदाचित, पण त्यांची ती प्रतिक्रिया, ते वाक्य मला बरंच काही शिकवून गेलं...६