प्राथमिक वर्गाच्या व्यवस्था करत असतांनाचा एक प्रसंग, भोजन व्यवस्था मार्गी लागल्यावर एका ज्येष्ठ कार्यकर्त्यानी माझे लक्ष एका गोष्टीकडे वेधले. ज्या संस्थेत वर्ग चालू होता, त्या संस्थेतील कर्मचारी न्याहारी व भोजन करायला वर्गात येत आहेत. तिकडे लक्ष द्यायला सांगितले, त्यांची भूमिका अशी होती कि, वर्गाला येणारे स्वयंसेवक आपल्या कष्टाच्या कमाईतून जमा केलेल्या पैशातून वर्गाचे शुल्क भरतात, तसेच इथे खर्च होणारे पैसे हे स्वयंसेवकांच्या समर्पणातून आलेले असतात, ते संघकामासाठीच खर्च व्हावेत.... , मलाही ती भूमिका पटली व मी लगेच कामाला लागलो. काही वेळानी मला एक कर्मचारी न्याहारी करतांना दिसले. माझ्यातला खाकीपणा जागा झाला व मी त्यांची न्याहरी चालू असतांनाच त्यांना म्हणालो, "काका, अहो ही व्यवस्था इथे आलेल्या शिक्षार्थ्यांसाठी आहे, संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी नाही", त्यांचा चेहरा हिरमुसला झाला, कसे बसे न्याहारी संपवून ते गेले. हा प्रसंग आमचे भोजन व्यवस्था प्रमुख बघत होते, पण ते तेव्हा काही बोलले नाहीत. वर्गाच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांना मिसळपाव असा बेत ठरला होता. सकाळी सकाळीच मला आमचे भोजन व्यवस्था प्रमुख भेटले व म्हणाले "मी आज संस्थेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मिसळपाव खायला बोलावलं आहे, त्यांना कोणी हटकायला नको म्हणून तुम्हाला सांगितलं". मी पण लगेच "व्वा वा, छान केलंत" म्हणून म्हणालो, पण मला काय कळायचं ते कळलं होतं. संघाचा स्वयंसेवक हा कारुण्यभावनेने भरलेला असायला हवा. स्वयंसेवक हा कठोर हवा, पण ते स्वतःच्या बाबतीत, इतरांच्या बाबतीत त्याच्या मनात आपुलकी, बंधुभाव, करुणा ह्याच भावना प्रामुख्याने हव्या. आपल्या आचरणाने संघ कसा आहे हे शिकवणारे, दाखवून देणारे असे अनेक जमिनीवरचे कार्यकर्ते संघ तयार करतो. मला आमच्या भोजन प्रमुखांनी बौद्धिक न देता एका कृतीने ह्या प्रकारे संघ समजावून सांगितला, मला घडविला...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा