शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

विस्फारलेले डोळे, खुललेला चेहरा आणि फुललेलं हसू...

परवा राखीपौर्णिमेच्या आधीच्या दिवशी उर्वीच्या शाळेत सर्व पालकांना आपआपल्या मुलांना राखी बांधायला बोलावलं होतं. एकाच पालकानी यावं असा निरोप होता. उर्वी निरोप घेऊन आली, तसं आम्ही दोघंही म्हणालो की  काय तुमची शाळा सारखं सारखं पालकांना बोलावते, आता आम्ही पण van लावून टाकतो, तेवढ्या पाच मिनिटांसाठी एवढ्या लांब शाळेत सकाळच्या गडबडीत यायचं आणि काय तर आपल्याच मुलांना राखी बांधून परत यायचं, आपण घरी बंधू की राखी तुम्हा दोघींना, शाळेतच कशाला यायला हवं तेव्हढ्या साठी वगैरे वगैरे. अर्थात शाळेचा हेतू चांगलाच होता कार्यक्रमाचा पण तो विषय वेगळा. पण एकूण उर्वीचा सूर असा होता की कोणीतरी या ना, सगळ्यांचे पालक येतील, माझेच नाही, मग मला वाईट वाटेल. हा मुद्दा जरा अवघड आणि खूप महत्वाचा होता, तरी मी तिला सांगितलं, प्रयत्न करतो पण नाही आलो तर वाईट वाटून घेऊ नको, थोडी मोठी हो आणि आमच्या अडचणी समजून घे. सकाळी मुलींना बस मधे बसवून घरी आलो, रात्रीच हिला सांगितलं होतं कि शक्यतो मी जातो, तिलाही तसंच वाटत होतं. त्याप्रमाणे मी गडबडीत तयार झालो, राखी सोबत घेतली आणि निघालो. शाळेत दिलेल्या वेळेत पोचलो, मग आधी उर्वीच्या वर्गापाशी गेलो, माझ्या सोबत अन्यही आठ दहा पालक होते, संख्या कमीच होती पण होते. आम्ही वर्गाबाहेर जाऊन थांबलो, आणि मला उर्वी दिसली, समोरच तिसऱ्या चोथ्या रांगेत बसली होती, प्रार्थना चालू होती, ती म्हणत होती. पण दृष्टी बाहेर होती, माझ्या समोरचे पालक तिला दिसले तशी तीची हुरहूर वाढली, बाबा आले कि नाही, येतात कि नाही, डोळे शोधायला लागले होते, अस्वस्थता वाढली होती, आणि.... आणि.... दिसलो मी तिला, तो क्षण.....तिचे ते विस्फारलेले डोळे, खुललेला चेहरा, फुललेलं हसू... एका बाबाला काय हवं असतं ते मला त्या क्षणाला कळलं, मिळालं. तो क्षण, तिचा तो गोड फुललेला चेहरा फोटो काढून ठेवावा तसा माझ्या डोळ्यासमोर अजून आहे. तो तिच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद, मला काय देऊन गेला हे सांगता येणं अवघड आहे, पण मला एक कळलं मी गेलो नसतो तर मी फारच मोठ्ठ पाप केला असतं, किंबहुना एका फार छोट्या क्षणातून मिळणाऱ्या फार मोठ्या आभाळाएवढ्या आनांदाला मी मुकलो असतो. हीच अनुभूती पुढे लगेच अर्णवीच्या वर्गात जरा उशिराने गेलो तेव्हा आली, तसेच विस्फारलेले डोळे, खुललेला चेहरा आणि फुललेलं हसू...   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा