शुक्रवार, १९ मे, २०२३

हॉर्न वाजवणारी माणसं.......

हॉर्न वाजवणाऱ्या माणसांचे प्रकार (पुरुष, महिला, तरुण प्रौढ सगळ्यांना लागू, काही अपवाद नक्की असतील)-

१. स्वतः प्रचंड वेगात असतात, जातांना जोरजोरात हॉर्न वाजवत जातात, कोणी समोर असो नसो, रस्ता मिळो ना मिळो, हॉर्न काही थांबत नाही - अशी माणसं बहुतेक आत्मकेंद्री, स्वतः ला फार महत्व देणारी, मी जातोय, मी येतोय ह्याला लोकांनी फार महत्व दिले अशा भावात वावरणारी. ही जरका लौकिकदृष्ट्या जरा जरी यशस्वी झाली तरी अहंकारी होतात, स्वतःच्या हातात सूत्र ठेवायचा प्रयत्न करतात. 

२. वेगात नसतात उलट कधी कधी नको तितके हळू असतात, पण सतत हॉर्न वाजवत जातात, कोणी समोर असो नसो, रस्ता मिळो ना मिळो, हॉर्न काही थांबत नाही - अशी माणसं बहुतेक घाबरलेली, फार जपून वागणारी, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणारी, थोडा न्यूनगंड असणारी असतात. घरातील व्यक्तीच्या (नवरा, बायको, आई, वडील, भाऊ, बहीण, कधी कधी मुलेही) ह्यांच्या dominance खाली वाववारणारी असतात, ज्याप्रमाणे ह्यांचं मन हेलकावे खातं त्याप्रमाणे हॉर्न चा आवाज किंवा लांबी कमी जास्त होते. थोडी स्वतःमध्ये गुंग असणारी असतात.

३. हिरवा सिग्नल पडलेला नसतांना, किंवा पडल्या पडल्या लगेच हॉर्न वाजवायला सुरवात करणारी, ही माणसं कायम समोरच्याला तुच्छ लेखणारी,  अति अहंकारी, सतत घाईत, स्वतःच्या चुकांवर पांघरुण घालणारी, आणि दुसऱ्याच्या चुका जगजाहीर करणारी, बऱ्यापैकी डॉमिनेटिंग असतात. हि मंडळी हुशार किंवा ज्ञानी असतातच असे नाही पण मुळातील असलेला महत्वाकांक्षी व आक्रमक स्वभाव ह्यामुळे लौकिकदृष्ट्या जरा स्थीर असू शकतात. 

४. सतत, परिस्थिती कुठलीही असो, वाहतूक कमी असली तरी चुकून जरी कोणी समोर आले तरी कर्णकर्कश्श हॉर्न वाजवणारी माणसं - ही माणसं रागीट, तापट स्वभावाची असतात. कायम कोणावर तरी उखडलेले, हसणं विसरलेले,  कायम चिडचिड करणारी, कदाचित घरात, कामाच्या ठिकाणी नकोशी झालेली अशी असू शकतात. ह्यांना जगात सकारात्मक काही दिसतंच नाही, कुठलाही विषय ते नकारात्मक वळणावर आणू शकतात, कामं करतात पण त्याचा आनंद घेऊ शकत नाहीत, ह्यांचा सहवास फार सुखकारक नसतो. 

५. आवश्यक तेव्हाच, समोरच्याचे आपल्याकडे लक्ष्य नाही ह्याची पक्की खात्री झाल्यावरच, व त्यामुळे अपघाताची शक्यता आहे असे वाटल्यावरच हॉर्न वाजवतात, अन्यथा शक्यतो हॉर्न वाजवत नाहीतच - अशी माणसं शांत, सुस्वभावी, हवीहवीशी अशी असतात. घराच्या मंडळी अशा माणसांना मिस करतात, हायपर न होता तणावाला सामोरी जाणारी. बहुतेकांचा ह्यांच्यावर विश्वास असतो, आदर्शवादी असली तरी कामात एकदम हुशार असतीलच असे नाही, पण इतरांचा विचार करणारी असल्याने प्रेमळ असू शकतात. ह्यांच्यामध्ये आक्रमकता कमी आहे असा इतरांचा समज असल्याने खूप मोठ्या जबाबदाऱ्या मिळत नाहीत, त्यामुळे लौकिकदृष्ट्या ठीक ठाक असतात.   

६. गाण्याच्या तालावर हॉर्न वाजवत जाणारी - थोडी आत्मकेंद्री, आपल्या एन्जॉयमेंट चा दुसऱ्याला त्रास होईल ह्याची जाणीव नसणारी, पण हरहुन्नरी, नेहमीच अशाच पद्धतीने वागतील असे नक्की नाही, थोडी लहरी, त्यामुळे ह्यांच्यावर लोकांचा विश्वास जरा कमी असतो, पण जी गोष्ट हे मनावर घेतात ती शक्यतो मनापासून करतात. ह्यांच्यावर जबरदस्ती करून उपयोग नाही, बॉसिंग करून उपयोग नाही, मैत्रीत काम करून घेतल्यास काम होण्याची शक्यता जास्त. ह्यांचे स्वतःचे मित्रमंडळ खूप असते, थोडी एक्सट्रोव्हर्ट आणि बाहेर जास्त रमणारी, बिनधास्त प्रकारची.